Title

Sabhapati Speech

  • Home
  • Sabhapati Speech
Ideology

सभापती

हरीश एकनाथजी मोरे

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा बाजारामध्ये विविध घटकांमार्फत पुरवण्याच्या उदात्त हेतूने आणि असीम्रताने प्रेरित होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. बाजार समितीच्या कार्यप्रणाली आणि शेतकऱ्यांच्या प्रति लवचिक धोरणातून हेच प्रतीत होत आहे.

बाजार समितीला प्राप्त होणारे वैभव हे बळीराजाच्या कष्टाचे आणि काळ्या माती जिरलेल्या त्यांच्या घामाचे सुगंधित प्रतीक आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला विक्री आणि तदनुषंगीत सर्व सुविधा किफायतशीर दरामध्ये आणि अतिशय कमी वेळेमध्ये पुरविण्याचा आमचा मानस आहे.

बाजार आवारामध्ये स्वच्छता, आवार सुशोभीकरण, विद्युत पुरवठा, प्रशस्तर रस्ते, माल साठवणुकीची भव्य क्षमता, पारदर्शक व्यवहार, स्वच्छ प्रशासन या सर्व गोष्टी राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

शेतकऱ्यांना शिदोरी भावना पासून ते मोफत धान्य चाळणी यंत्रापर्यंत आणि शेतमालाच्या अद्यावत मोजमापापासून ते पारदर्शक प्रशासनापर्यंत सर्व सुविधा पुरविण्यासाठी आम्ही संचालक मंडळ व सर्व प्रशासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे.

पश्चिम विदर्भातील उच्चत्तम आणि नामांकित असणारे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत काही दिवसात शेतकऱ्यांकरिता मोबाईल एसएमएस द्वारे विनामूल्य बाजारभाव तथा धान्य चाळणी यंत्राद्वारे माफक दरात धान्य सफाई तसेच बाजार समितीचे उत्पन्नात वाढ, अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेद्वारे नियंत्रण करून शेतमालाचे संरक्षण, 80 मेगा टन व 100 मेगा टन नवीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्याचे इन्स्टॉलेशन, माफक दरात शेतकऱ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे व शासनाच्या इनाम योजनेद्वारे संगणकीय प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या शेतमालाजी खरेदी विक्री करण्यात येत आहे व विकास आराखड्याप्रमाणे 3 लक्ष क्विंटल साठवणूक क्षमता असलेले मोठे शेडचे बांधकाम झालेले असून टीएमसी यार्ड वरील शेड पूर्ण झाले असून गाळण यंत्राजवळील व पाण्याच्या टाकी जवळील शेड सुद्धा या संचालक मंडळाचे काळात पूर्णत्वास येईल. तसेच सर्व संयुक्त बहुउपयोगी इमारत बांधण्यात येत आहे. याचे सर्व श्रेय कृषी उत्पन्न बाजार समितीला भरभराटी देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अचूक मोजमाप करणाऱ्या अडते, व्यापारी बांधवांना, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजपर्यंतच्या सर्व सर्वोदय शेतकरी प्रतिनिधी आणि सर्व संचालक मंडळींना, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व हमाल, मापारी बांधवांना, या बाजार आवाराच्या आणि शेतकरी विचारधारेच्या सर्व शुभचिंतकांना, सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंदांना, तसेच शेतकऱ्यांच्या केंद्रबिंदू म्हणून बाजार आवारात शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या धीरोदात्त लोकहितादक्ष प्रतिनिधींना जाते.

बाजार समितीच्या विकासाच्या प्रवाहात शेतकरी केंद्रित धोरण आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा मागवा घेणारा कारभार, स्वच्छ आणि पारदर्शक रित्या राबविण्याची आम्ही प्रयत्न करतो. येत्या काळात सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा सर्व अभ्यासू आणि शेतकरी हिता प्रति जागृत असणाऱ्या आदरणीय लोकप्रतिनिधी तसेच बाजार आवारातील सर्व लहान मोठ्या आदरणीय घटकांच्या आशीर्वादाने आणि साथीने विविध विकास कामे आणि त्यांच्या पूर्णत्वातून मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्याची आम्ही शपथ घेतो.

आगामी काळामध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट आणि गांडूळ खत बनवण्याचे प्रकल्प, शेतमालाच्या साठवणुकी करिता गोदाम व्यवस्थेबरोबर, शीतगृह उभारणी, बारदाना तथा फुलांचे बाजाराचे अधिकृतरित्या नियमन, कापूस आणि कडधान्यांसाठी प्रक्रिया उद्योग, बाजार आवर सुशोभीकरण आणि प्रशस्तीकरण व केंद्र शासनाच्या इनाम योजनेद्वारे संगणकीय प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री व ऑनलाइन पेमेंट, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या उत्पादनानंतर कराव्या लागणारे सर्व प्रक्रिया त्यात अंतर्भूत सर्व शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्या समन्वयासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

एकंदर बळीराजाला केंद्रबिंदू मानून काम करण्याचे मानस आम्ही अंगीकारण्याचा आणि बनवण्याचा निर्धार केला आहे. ज्ञानयोगी स्वर्गवासी डॉक्टर श्रीकांत जिचकर साहेब, सहकार महर्षी कै. भाऊसाहेब भोकरे व माननीय स्वर्गीय बापूसाहेब काळबांडे तसेच स्वर्गीय भैय्यासाहेब उपाख्य चंद्रकांतजी रावसाहेब ठाकूर यांच्यासारख्या थोर सामाजिक व सहकारी दृष्ट्यांचे नेतृत्व विचार सामर्थ्याने पूर्ण झालेल्या या अंबा नगरीतील आणि समस्त वैदर्भीय शेतकऱ्यांच्या सर्व अडचणींना आणि समस्यांचा विनाश करण्याकरिता बाजार आवाराशी निगडित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सर्व आदरणीय थोर घटकांचा पाठिंबा आणि सहकार्य लाभावी ही सदिच्छा.

हरीश एकनाथराव मोरे

सभापती

कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती